नाशिक विभाग पदवीधर मतदार संघासाठी विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना टिडीएफची उमेदवारी जाहीर: विजय बहाळकर
पुणे (संपादक-डॉ.संदीप गाडेकर) दि. 8 येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये नाशिक विभाग व कोकण विभाग शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत या पार्श्वभूमीवर टीडीएफच्या उमेदवारी बाबत आज राज्य कार्यकारिणीची बैठक विजय बहाळकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विद्यालय, सदाशिव पेठ पुणे येथे पार पडली यावेळी ते बोलत होते.
यावेळी यांनी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघासाठी विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देऊन सर्वानुमते हे नाशिक विभाग मतदार संघाचे टीडीएफ उमेदवार असतील असे जाहीर करण्यात आले. डाॅ.सुधीर तांबे हे विद्यमान पदवीधर आमदार असून शिक्षकांसाठी त्यांचे कार्य मोलाचे आहे तसेच विधानपरिषदेमध्ये वेळोवेळी त्यांनी शिक्षकांच्या तसेच युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ते प्रचंड बहुमताने निवडून येतील असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.
तसेच कोकण विभाग पदवीधर शिक्षक विभाग मतदार संघाच्या उमेदवारीबाबत प्रत्यक्ष रत्नागिरी येथे बैठक घेऊन राज्य कार्यकारणीच्या वतीने लवकरच उमेदवार जाहीर केले जातील असे बैठकीमध्ये सर्वानुमते ठरविण्यात आले.
यावेळी टीडीएफचे सचिव हिरालाल पगडाल यांनी मागील बैठकीचा वृत्तांत वाचून येणाऱ्या काळामध्ये संघटना वाढीसाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असून लवकरच राज्यातील सर्व विभागाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल असे स्पष्ट केले.
यावेळी राज्याचे उपाध्यक्ष ,नाशिक विभागाचे माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, राज्य विश्वस्त के.एस.ढोमसे, कार्याध्यक्ष जी.के. थोरात यांनीही आपल्या मनोगतामध्ये संघटना वाढीबाबत तसेच येणाऱ्या काळातील नियोजनाबाबत योग्य पावले उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
सदर बैठकीस राज्य चे उपाध्यक्ष माजी प्राचार्य हनुमंत भोसले, नाशिक विभागाचे माजी आमदार राज्य टिडीएफचे उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, राज्य टिडीएफचे कार्याध्यक्ष जी.के. थोरात, राज्य टीडीएफ चे विश्वस्त के. एस.ढोमसे, पुणे जिल्हा टीडीएफ अध्यक्ष मुरलीधर मांजरे, पुणे शहर टीडीएफचे अध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव कामथे तसेच नाशिक व कोकण त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याचे पदाधिकारी, विभागाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment