प्रेमातूनच जाती अंत शक्य! - प्रदीप निफाडकर
प्रेमातूनच जाती अंत शक्य! - प्रदीप निफाडकर
तळेगांव स्टेशन (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) दि.17 प्रेम ही उदात्त संकल्पना आहे. तिला विनाकारण बदनाम केले जाते. महाविद्यालयीन युवकांनी प्रेमाचा सात्विक अनुभव घेत आयुष्याला सामोरे जावे त्यातून जाती अंतासारख्या मोठ्या प्रश्नाची उकल सहज शक्य असल्याचे मत सुप्रसिद्ध गझलकार प्रदीप निफाडकर यांनी व्यक्त केले.इंद्रायणी महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
याप्रसंगी प्राचार्य डॉ संभाजी मलघे, मराठी विभागप्रमुख डॉ विजयकुमार खंदारे, प्रा सत्यजित खांडगे,डाॅ संदीप कांबळे,डाॅ प्रमोद बोराडे, प्रा राजेंद्र आठवले तसेच विविध विषयांचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऐकले नाही जगाचे छान केले l
मी तुला तारूण्य माझे दान केले ll
प्रेमाच्या या गझलेचा संदर्भ देत, प्रेमात लिहिलेली गझल जगण्याला उर्मी देते तर दु:खातली गझल वेदनांचा निचरा करते असे निफाडकर म्हणाले. याप्रसंगी त्यांनी पंधराव्या शतकापासूनचा गझलेचा प्रवास उलगडून सांगितला तसेच गझलेचे शब्दवैभव आणि त्यातील व्याकरणाची सखोल माहिती प्राध्यापक व विद्यार्थ्यांना करून दिली.
मराठी ही जगातील अत्यंत सुंदर भाषा असून मातृभाषा म्हणून आपल्याला मराठीचा अभिमान असायला हवा यासाठी आपण शक्य असेल तेथे मराठीचाच आग्रह धरायला हवा असे निफाडकर म्हणाले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ विजयकुमार खंदारे यांनी केले. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याची रूपरेषा त्यांनी स्पष्ट केली तसेच निफाडकर यांच्या समृध्द लेखन प्रवासाचा परिचय डाॅ खंदारे यांनी करून दिला.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्रा सत्यजित खांडगे म्हणाले की, आजच्या घडीला मराठी गझलेबदल अभ्यासपूर्वक मांडणी, आणि विवेचन करणारे प्रदीप निफाडकर हे एकमेवाद्वितीय आहेत. कवी सुरेश भटांचा त्यांना मिळालेला अनुग्रह त्यांच्या लेखणीला वृद्धिंगत करत गेला. निफाडकर यांच्या काव्यप्रतिभेने मराठी गझलेला जागतिक उंची प्राप्त करून दिली हे त्यांचे योगदान निर्विवाद असल्याचे प्रा खांडगे यांनी सांगितले.
या कार्यक्रमास इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे व प्राचार्य डॉ संभाजी मलघे यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ संदीप कांबळे यांनी केले तर आभार प्रा राजेंद्र आठवले यांनी मानले.
Comments
Post a Comment