अनिकेत थोरात यांचे एमपीएससीच्या परीक्षेत घवघवीत यश: सहाय्यक कामगार आयुक्त क्लास वन पदावर होणार नियुक्ती
अनिकेत थोरात यांचे एमपीएससीच्या परीक्षेत घवघवीत यश: सहाय्यक कामगार आयुक्त क्लास वन पदावर होणार नियुक्ती
पुणे (प्रतिनिधी) दि. 25
नुकताच राज्यसेवा 2021 च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. जवळपास 400 जागांसाठी तीन लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांची प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य टीडीएफचे कार्याध्यक्ष जी.के. थोरात यांचे चिरंजीव अनिकेत थोरात यांनी घवघवीत यश संपादन केले असून सहाय्यक कामगार आयुक्त क्लास वन या पदावर त्यांची नियुक्ती निश्चित झालेली आहे.
अनिकेत हा टीडीएफ चे राज्य कार्याध्यक्ष, शिक्षक नेते जी.के. थोरात यांचा चिरंजीव असून लहानपणापासूनच त्याला प्रशासकीय सेवेची आवड होती. त्याने सीईओपी, मधून बी.टेक चा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असून तो कायमच गुणवत्ता यादीत आलेला आहे. अतिशय हुशार आणि चाणाक्ष बुद्धिमत्ता अशी त्यांची ओळख होती त्याने आपल्या यशातून हे सिद्ध केले.
यापूर्वीच त्याने राज्यसेवेच्या परीक्षेतून नायब तहसीलदार पदाला गवसणी घातली होती सध्या त्याचे या पदासाठीचे प्रशिक्षण चालू आहे. सलग दोन वेळा तो राज्य सेवेच्या परीक्षेमध्ये यशस्वी झालेला आहे .
आपल्या यशामध्ये आई-वडिलांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा असून अभ्यासामध्ये सातत्य, चिकाटी असेल तर हमखास आपल्याला यश मिळते असे यावेळी त्यांने स्पष्ट केले. या यशावर समाधान न मानता भविष्यामध्ये आयएएस होण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. अनिकेतचे वडील ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रामध्ये कार्यरत असून सध्या ते जयहिंद विद्यालय कासुर्डी या ठिकाणी मुख्याध्यापक पदी कार्यरत आहेत तर आई गृहिणी आहे. आपल्या मुलाने मिळवलेल्या यशाचा नक्कीच त्यांना अभिमान आहे. आपल्या मुलाच्या यशाबद्दल आई-वडिलांनी पेढा भरवून तसेच पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता.
खुटबाव, तालुका दौंड या गावातील अनिकेत थोरात हा पहिलाच क्लास वन अधिकारी झाल्यामुळे गावातील लोकांच्या तसेच नातेवाईकांच्या मध्ये आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अनिकेतच्या यशाबद्दल पुणे शहर शिक्षक लोकशाही आघाडी व पुणे शहर माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने प्राचार्य शिवाजीराव कामथे सरांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व पेढा भरवून अभिनंदन केले व पुढील भावी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पुणे शहर सचिव संतोष थोरात, टीडीएफ चे उपाध्यक्ष प्राचार्य राज मुजावर, कनिष्ठ महाविद्यालयीन टीडीएफचे पुणे शहराध्यक्ष प्रा. शशिकांत शिंदे तसेच टीडीएफचे उपाध्यक्ष सुनील गिरमे उपस्थित होते.
Comments
Post a Comment