इनरव्हील क्लब ऑफ तळेगांव दाभाडे तर्फे रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थिनींना डॉ विनया केसकर यांचे अनमोल मार्गदर्शन
इनरव्हील क्लब ऑफ तळेगांव दाभाडे तर्फे रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थिनींना डॉ विनया केसकर यांचे अनमोल मार्गदर्शन
तळेगाव दाभाडे (प्रतिनिधी) दि.०७ ऑगस्ट, २१व्या शतकातील आव्हानांना तोंड देण्यासाठी जीवन कौशल्यांचा वापर करून सर्वांगीण विकास कसा साध्य करावा, याबद्दल डॉ विनया केसकर यांनी रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेतील इयत्ता ९ वी व १०वी तील विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. इनरव्हील क्लब, तळेगांव दाभाडेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. समस्या निर्माण झाल्यानंतर, मानसिक ताण आल्यानंतर तो कमी करण्यापेक्षा तो ताण निर्माण होऊच नये यासाठी काय काळजी घ्यावी, त्यासाठी कोणती जीवन कौशल्ये अंगीकृत करावीत, स्वतःचा शोध घेऊन आपल्या क्षमतांचा विकास कसा करावा, स्वजाणिवा समृद्ध कशा कराव्यात याची शिदोरी अगदी सहज सोप्या, ओघवत्या शब्दात त्यांनी मुलींना दिली. विद्यार्थिनींशी संवाद साधताना त्यांनी त्यांनाही बोलते केले. स्वतःची ओळख कशी आत्मविश्वासाने करून द्यावी, स्वतःमधील गुण दोष ओळखून गुणात्मक दर्जा कसा वाढवावा याची जाणीव विद्यार्थिनींना करून दिली.
क्लब प्रेसिडेंट संध्या थोरात यांनी या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यांनीही विद्यार्थिनींशी संवाद साधला. शाळेच्या मुख्याध्यापिका धोत्रे यांनी इनरव्हील क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. क्लब प्रेसिडेंट संध्या थोरात, सेक्रेटरी निशा पवार, जॉईंट सेक्रेटरी रश्मी थोरात, ट्रेझरर भाग्यश्री काळेबाग, सीसी संगीता शेडे, ममता मराठे, ज्योती ढोरे , कल्पना जाधव उपस्थित होत्या. जॉईंट सेक्रेटरी रश्मी थोरात यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment