सरकारच्या शाळा दत्तक योजनेच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा टीडीएफने दिला इशारा

सरकारच्या शाळा दत्तक योजनेच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा टीडीएफने दिला इशारा

पुणे (प्रतिनिधी) 19 सप्टेंबर 2023

 


महाराष्ट्र सरकारने नुकताच कार्पोरेट कंपन्यांना, संस्थांना शाळा दत्तक देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.  हा निर्णय शाळा व शिक्षण क्षेत्रावर घाला  घालणारा असून हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अन्यथा टीडीएफ च्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा टीडीएफचे राज्य कार्याध्यक्ष जी.के थोरात, प्राचार्य शिवाजीराव कामथे, पुणे विभाग टीडीएफचे खजिनदार सचिन दुर्गाडे, पुणे शहर टीडीएफचे अध्यक्ष संतोष थोरात ,पुणे शहर कनिष्ठ महाविद्यालय टीडीएफचे अध्यक्ष प्रा. शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.

 शासनाचा सदर निर्णय आरटीई च्या धोरणाला हरताळ फासणारा असून शासनाची शिक्षण क्षेत्राचे पूर्णपणे खाजगीकरण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे असे चित्र दिसते. सरकारी शाळा अशा कंपन्यांना व संस्थांना दत्तक देण्यापेक्षा या कंपन्यांच्या सीएसआर फंडाच्या माध्यमातून शाळांमध्ये उत्कृष्ट भौतिक सुविधा पुरवाव्यात, सरकारकडून दर्जेदार शिक्षणाची सुविधा निर्माण करावी अशी अपेक्षा टीएफच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

    खाजगी कंपन्यांना कंत्राट देऊन शिक्षकांची भरती करणे, खाजगी संस्थांना, कंपन्यांना शाळा दत्तक देणे, मानधन तत्वावर शिक्षकांची नेमणूक करणे, वेळेत शिक्षक भरती न करणे अशा प्रकारच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेचे पूर्णपणे वाटोळे झाले असून सरकारने अशा प्रकारचे निर्णय त्वरित मागे घ्यावेत. सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्राचे टीडीएफचे कार्याध्यक्ष जी. के. थोरात यांनी केली आहे. सरकारला निवेदन देऊन सर्व निर्णय सरकारने त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश