मावळमधील एकाधिकारशाही, हिटलरशाही मोडून काढा रामदास काकडे यांचा सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत आमदार शेळकेंवर घणाघात
तळेगाव दाभाडे :
आमदार सुनील शेळके यांनी कोणत्या हेतूने 'गावगुंड' हा शब्द वापरला, हे त्यांनाच माहीत. मुळात आमदार शेळके हेच मावळची संस्कृती मोडीत काढण्याचे काम करीत आहेत, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामदास काकडे यांनी केली.
आमदार सुनील शेळके यांनी धमकीचा एक कॉल मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दाखवला. त्याचा खुलासा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, गणेश भेगडे, रवींद्र भेगडे, निवृत्ती शेटे, भाजपचे मावळ तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ गुंड, शिवसेना (उबाठा) पक्षाचे तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबुराव वायकर, संतोष कुंभार, सचिन घोटकुले, बाळासाहेब घोटकुले, दत्तात्रय माळी, बाबुलाल गराडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना रामदास काकडे यांनी सांगितले, गेल्या निवडणुकीत सुनील शेळकेंना आमदार करण्यासाठी जे पुढे होते. ते सर्वजण आज आमदार शेळकेंना सोडून का गेले ? याचे आत्मपरीक्षण त्यांनी करणे गरजेचे आहे. शरद पवार साहेबांना उलटं बोलण्याइतके आमदार शेळके कधी मोठे झाले ? मदन बाफना यांना 'तुमच्याकडे पाहून घेतो', इतकी मग्रुरी कुठून आली ? सुरक्षित गुंतवणुकीच्या दृष्टीने मावळचे नाव जागतिक स्तरावर अगदी वर आहे. मात्र, गेल्या पाच वर्षात अनेक असुविधामुळे कंपन्या मावळ सोडायचा विचार करीत आहेत. शिक्षण संस्थांना बंद पाडण्याचे कारस्थान रचले जात आहे. तरुणांना व्यसनात गुंतवले आहे, वाईट गोष्टीसाठी प्रवृत्त केले जात आहे. तरुणांचे व्यवसाय बंद केले जात आहेत. हे असेच सुरू राहिले, तर मावळचा उडता पंजाब व्हायला वेळ लागणार नाही. आमदार शेळके यांच्यामुळे सुरू असलेल्या या गोष्टी बंद होऊन मावळची संस्कृती जपली जाण्यासाठी बापूसाहेब भेगडे हेच एकमेव पर्याय आहेत.
शेती, पर्यटन, शिक्षण, आरोग्य या सर्व गोष्टीमुळे मावळ आज पुढे आहे. मात्र, गेल्या पाच वर्षात या सर्व क्षेत्रांकडे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. मावळला पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीने, तसेच महिला सक्षमीकरण, तरुणांच्या हाताला काम, व्यसनमुक्त तरुणाई, शिक्षणात प्रगती आदी गोष्टी फक्त अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडेच गांभीर्याने घेऊ शकतात. तसा विश्वासही भेगडे यांनी दिला आहे. त्यामुळेच बापूसाहेब भेगडे हे खऱ्या अर्थाने जनतेचे उमेदवार आहेत, असेही रामदास काकडे म्हणाले.
चंद्रकांत सातकर म्हणाले, की कधी नव्हे ती भयावह परिस्थिती यावेळी मावळ तालुक्यात झाली आहे. आजपर्यंत अनेक आमदार या तालुक्याने दिले, पण आमदार शेळकेंना होतोय इतका विरोध कधी दिसला नाही. भाजप व काँग्रेस हे राजकारणात कट्टर विरोधक आमदार शेळकेंना पराजित करण्यासाठी एकत्र आले आहेत, यातच सर्वकाही आले.
आशिष ठोंबरे यांनी सांगितले, की अलिकडे मावळाचं मिर्झापूर होत चालले आहे. विरोधकांकडून भावनिक राजकारण करून पाठिंबा मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे.
रुपेश म्हाळसकर म्हणाले, की आमदार शेळके यांनी ‘गावगुंड’ शब्द चुकीच्या पद्धतीने वापरला आहे. त्यांचा आम्ही निषेध करतो. अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे हे संस्कृती जपण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे मावळवासिय त्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे आहेत.
दत्तात्रय पडवळ म्हणाले, की राजकीय पक्षांमधील मैत्री बिघडवण्याचे काम आमदार शेळके करीत आहेत. त्यांनी सरपंचांची कार्यपद्धती संपविण्याचे काम ते करीत आहेत. अपक्ष बापूसाहेब भेगडे तरुणांना रोजगार, पर्यटनाला चालना देण्याचे काम निश्चित करतील, असा विश्वास आहे.
रुपेश म्हाळसकर यांनी प्रास्ताविक, तर बाळासाहेब घोटकुले यांनी आभार मानले.
----------------------------------------------------------------
Comments
Post a Comment