आई-वडिलांचे भांडण सुरु असताना सात वर्षाच्या मुलीने सोडले घर; पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुलगी सुखरूप परतली

 

तळेगाव दाभाडे दि. 20 (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) घरात आई वडिलांचे भांडण सुरु असताना घाबरून सात वर्षाच्या मुलीने घर सोडले. मुलगी भरकटत सुमारे चार ते पाच किलोमीटर लांब आली. चौकात असलेल्या वाहतूक पोलीस महिलेला लहान मुलगी रडत असल्याचे दिसले. त्यानंतर पोलीस महिलेने सतर्कता दाखवत मुलीच्या पालकांचा शोध घेऊन मुलीला पालकांच्या  सुखरूपपणे स्वाधीन केले.

तळेगाव स्टेशन येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महिला वाहतूक पोलीस ज्योती सोनवणे बुधवारी सायंकाळी वाहतूक नियोजन करीत होत्या. चौकात बराच वेळ झाला तरी एक लहान मुलगी एकसारखी रडत होती. तिला घ्यायला तिचे पालक येत नव्हते. त्यामुळे ज्योती सोनवणे यांनी मुलीकडे जाऊन तिला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली. मुलीने तिचे नाव प्राची चव्हाण, गाव कातवी, शाळा जिल्हा परिषद शाळा वराळे असे सांगितले. मात्र ती घाबरलेली होती. त्यामुळे सोनवणे यांनी मुलीला शांत केले.

त्यानंतर प्राची बाबत सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस यांना माहिती दिली. सोशल मीडियावर प्राचीचा फोटो आणि माहिती पाठवण्यात आली. डोळस यांनी ती माहिती वराळे येथील लोकांच्या सोशल मीडिया ग्रुपवर पाठवली. काही वेळेत मुलीची ओळख पटविणारे फोन आले. महिला पोलीस ज्योती सोनवणे, वॉर्डन श्री भोसले आणि मुलीला घेऊन दिलीप डोळस वराळे गावात गेले. घरासमोर गेल्यानंतर प्राचीने आई-वडिलांना ओळखले. ओळखीची खातरजमा करून प्राचीला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

प्राची प्रभाकर चव्हाण (वराळे) ही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकते. बुधवारी सकाळी ती शाळेत गेली. शाळेतून पाच वाजता घरी आल्यानंतर घरात तिच्या आई-वडिलांचे भांडण सुरु होते. भांडणाला घाबरून प्राचीने घराबाहेर पळ काढला. प्राची रडत रडत घरापासून सुमारे चार ते पाच किलोमीटर तळेगाव स्टेशन येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत आली. चौकात ती रडत बसली. चौकातून पुढे कुठे जावे तिला सुचत नव्हते. तसेच आपण आलेला रस्ता देखील ती विसरली होती. दरम्यान, ज्योती सोनवणे यांनी तत्परता दाखवून तिला तिच्या घरी  पोहोचवले.

"लहान मुलांवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला हवे. मुलांच्या मनावर वाईट परिणाम होईल असे वर्तन पालकांनी मुलांसमोर करू नये. सुदैवाने प्राचीचे पालक लवकर मिळाले. पालकांची खातरजमा करून मुलीला पालकांच्या ताब्यात दिले आहे."

– ज्योती सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल, तळेगाव वाहतूक विभाग.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 
डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो. 8208185037

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश