लोकरंगनायिका' पुस्तकाचे २५ फेब्रुवारीला पुण्यात प्रकाशन



तळेगाव दाभाडे दि. 15 (प्रतिनिधी) लोकसाहित्य आणि लोककलांचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांच्या 'लोकरंगनायिका' या पुस्तकाचे प्रकाशन येत्या 25 फेब्रुवारी रोजी, सायंकाळी 5 वाजता 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ' येथील ‘संत नामदेव सभागृहा'त होणार आहे. 'पद्मगंधा प्रकाशन'तर्फे प्रकाशित होणाऱ्या या पुस्तकात 'पद्म', तसेच 'संगीत नाटक अकादमी' पुरस्कार-प्राप्त राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कीर्तिच्या महिला लोककलावंतांच्या जीवनाचा, त्यांच्या कलेचा आणि त्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षांचा मागोवा घेण्यात आला आहे.

'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा'चे 'ललित कला केंद्र, गुरुकुल’, 'पद्मगंधा प्रकाशन' आणि 'महाराष्ट्र कला संस्कृती मंच' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होणाऱ्या या प्रकाशन समारंभाला कर्नाटकच्या पद्मश्री मंजम्मा जोगती, 'संगीत नाटक अकादमी'च्या अध्यक्ष डॉ. संध्या पुरेचा, 'महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा'चे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ कवयित्री आणि 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा'च्या 'संत ज्ञानदेव अध्यासना'च्या प्रमुख डॉ. अरुणा ढेरे, तसेच 'कालनिर्णय'कार जयराज साळगावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रकाशन समारंभाचे अध्यक्षस्थान 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा'चे कुलगुरू प्रोफेसर सुरेश गोसावी भूषविणार आहेत. तर प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सोबतच न्यायमूर्ती डॉ. ह.भ.प. मदन महाराज गोसावी, तसेच ह.भ.प बाळासाहेब काशीद यांचीही विशेष पाहुणे म्हणून उपस्थिती असणार आहे. 


'लोकरंगनायिका' या पुस्तकात पद्मविभूषण तीजनबाई, पद्मश्री नौटंकी कलावंत गुलाबबाई, पद्मश्री यमुनाबाई वाईकर, संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या विठाबाई नारायणगावकर, पद्मश्री सुलोचना चव्हाण, गुजरातच्या लोककलावंत धनबाई कारा, बाऊल संगीताच्या कलावंत पार्वती बाऊल, कालबेलिया कलावंत गुलाबो सपेरा, पद्मश्री मंजम्मा जोगती, लावणी नर्तिका राजश्री नगरकर अशा नामांकित महिला लोककलावंतांचे जीवनचरित्र शब्दबद्ध करण्यात आले आहे. हे पुस्तक म्हणजे एकप्रकारे या लोककलावंतांच्या सुख-दुःखाला फोडलेली वाचा आहे.

या महिला लोककलावंतांच्या आयुष्याचं एखादं पान रसिकांसमोर उलगडण्यासाठीच या प्रकाशन समारंभात कर्नाटकच्या पद्मश्री पुरस्कार विजेत्या लोककलावंत मंजम्मा जोगती यांची प्रकट मुलाखत 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा'चे ललित कला केंद्र विभागाचे प्रमुख प्रा. प्रवीण भोळे आणि कर्नाटकच्या 'द्रविडियन विद्यापीठा'चे अधिष्ठाता प्रा. डॉ. व्यंकटेश घेणार आहेत. याच समारंभात 'मुंबई विद्यापीठा'च्या 'लोककला अकादमी'चे प्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे आणि अभिनय-प्रशिक्षक योगेश चिकटगावकर आणि त्यांचा संच 'लोकरंग महाराष्ट्राचे’ हा कार्यक्रम सादर करणार आहे. याशिवाय रेश्मा परितेकर, प्रमिला लोदगेकर, डॉ. सुखदा खांडगे, विकास कोकाटे आदी कलावंत या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

महिला लोककलावंतांचा सन्मान करणाऱ्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला साऱ्यांनी अगत्याने रहावे, असे आवाहन 'पद्मगंधा प्रकाशन'चे अभिषेक जाखडे  तसेच ‘ललित कला केंद्राचे प्रवीण भोळे आणि 'महाराष्ट्र कला संस्कृती मंच'च्या शैला खांडगे यांनी केले आहे.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा