उसण्या प्रकाशावर आपल्याला वाट चालता येत नाही - प्राचार्य डॉ. प्रदीप कदम

 

तळेगाव दाभाडे दिनांक 19 (प्रतिनिधी) "उसण्या प्रकाशावर आपल्याला वाट चालता येत नाही. स्वतःला स्वयंप्रकाशित झाल्याशिवाय आपल्या ध्येयाची वाटचाल आपल्याला सर करता येणार नाही, हा विचार छत्रपती शिवाजी महाराज देतात. याचे आपण डोळसपणे अवलोकन केले पाहिजे. पुरंदरचा पाच कलमी कार्यक्रम आपण एका वाक्यात सांगतो, पण हा महाराजांच्या आयुष्यातला सर्वात अवघड प्रसंग होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण विसरता कामा नये." असे गौरव उद्गार कॉन्क्वेस्ट महाविद्यालय चिखली येथील प्राचार्य डॉ. प्रदीप कदम यांनी काढले. ते आज इंद्रायणी महाविद्यालयात आयोजित शिवजयंती सोहळा उत्सव प्रसंगी कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्यवाह श्री. चंद्रकांत शेटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, डॉ. संजय आरोटे, प्रा. गुलाब शिंदे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संदीप भोसले, प्रा. रूपकमल भोसले, प्रा. विद्या भेगडे आदी मान्यवर उपस्थित होते. 



आपल्या प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी शिवजयंतीची पार्श्वभूमी, कार्यक्रम आयोजनामागील भूमिका आणि महाविद्यालयाचा साक्षेपी दृष्टिकोन अधोरेखित करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यांना उजाळा दिला. यावेळी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाचा वर्णन करणारा पाळणा सहअभिनय सादर केला. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ तसेच अनेक शूरवीर मावळ्यांची वेशभूषा करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. अथर्व लांडगे या विद्यार्थ्याने दांडपट्टा, लाठीकाठीच्या कसबी खेळाने उपस्थितांची मने जिंकून घेतली. कनिष्ठ महाविद्यालयातील मुलींनी तलवारबाजी करत जिजाऊंच्या कार्याचा विचार मांडला. 

पुढे कदम म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्या मावळ्यांवर नितांत प्रेम होते. रयतेच्या वेदना जाणतो तो खरा राजा असतो. आजच्या तरुणात झेप घेण्याचे सामर्थ्य आहे, पण त्याला 'स्व'ची जाणीव होत नाहीये ही खरी खंत आहे. आज आपल्यात परोपकाराची भावना जिवंत राहिली नाही. शिवचरित्रातील विचार डोक्यात घेऊन आत्मसात करण्याची गरज आहे. महापुरुषांना कोणत्या एका जातीधर्माच्या विळख्यात बांधू नका, कारण महापुरुष हे राष्ट्राचे असतात. जगात मोठे होता येते, त्यांचे मॅनेजमेंट छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकता येते. इतिहासात तत्त्वासाठी जगणारी आणि लढणारी माणसं आपल्याला सापडतात. मनगटाच्या बळावर विचारांच्या सामर्थ्यावर माणसाचे खरे सौंदर्य अवलंबून असते. कोंढाण्याचा इतिहास हा लढण्याची प्रेरणा देणार आहे. ज्याला त्याग आणि ध्येय कळाली, ती माणसं मोठी झाली. प्राचार्य डॉ. कदम यांनी शिवचरित्रातील विविध पैलूं सांगत विचारांची पेरणी केली."



कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे कार्यवाह श्री. चंद्रकांत शेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकत, महाविद्यालय नेहमीच चांगल्या कार्यक्रमाला पाठिंबा देत असल्याची भावना व्यक्त केली. तसेच कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. 

संस्थेचे अध्यक्ष श्री. रामदास काकडे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. कृष्णा मिटकर आणि कनिष्ठ वरिष्ठ तसेच फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रा. आर. आर. डोके यांनी मानले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay


Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश