राज्य शासनाच्या 'उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कारा'ने डॉ. संभाजी मलघे यांचा गौरव

 

तळेगाव दाभाडे दि. ३० (प्रतिनिधी) येथील इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने उत्कृष्ट प्राचार्य पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे आयोजित कार्यक्रमात उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, आर्थिक विकास महामंडळाचे संचालक सचिन इटकर, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक गिरीष देसाई, महाराष्ट्र माहिती सहाय्यता तंत्रज्ञान केंद्राचे अध्यक्ष केंद्राचे यशवंत शितोळे यांच्या हस्ते डॉ. मलघे यांना सन्मानित करण्यात आले.


          डॉ. देवळाणकर म्हणाले, की अशा पुरस्कारामुळे महाविद्यालयांना काम करण्याची उर्मी मिळते. प्राचार्यांना प्रोत्साहन मिळते. विद्यार्थी घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये इंद्रायणी महाविद्यालय सातत्याने प्रयत्न करीत आहे. खेळाच्या क्षेत्रामध्ये या महाविद्यालयाची मक्तेदारी आहे. यावर्षी झालेल्या खो खो वर्ल्ड कप स्पर्धेत इंद्रायणी महाविद्यालयाच्या प्रियंका इंगळे या विद्यार्थिनीने भारताचे नेतृत्व करून भारताला विश्वचषक जिंकून दिला. तसेच करिअरकट्टा अंतर्गत 50 विद्यार्थी पीएस.आय., तसेच पोलीस सेवेमध्ये रुजू झाले आहेत. महाविद्यालयांनी अशी गौरवशाली कामगिरी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.


            सत्काराला उत्तर देताना डॉ. मलघे म्हणाले, की इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयामध्ये मागील 28 वर्षांपूर्वी मराठी विषयाचा प्राध्यापक म्हणून सेवेत रुजू झालो .त्यापूर्वी मी महाराष्ट्र शासनाच्या शासकीय महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होतो. गेल्या सात वर्षापासून इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यरत आहे. संस्थेने जी जबाबदारी दिली दिली, जो विश्वास दाखवला आहे, तो सार्थ करण्याचा आपण प्रयत्न करीत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य या शाखांबरोबर विज्ञान शाखेत करिअर करता यावे, यासाठी महाविद्यालयाच्या वरिष्ठ विभागात नव्याने विज्ञान शाखा सुरू केली. विविध विषयांचे संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. कंपन्यांसोबत करार करून विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. संस्थेच्या वाढीसाठी फार्मसी, इंजिनिअरिंग महाविद्यालय सुरू करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करून आज प्रत्यक्षात ही महाविद्यालये सुरू झाली आहेत. या सगळ्या कामाची पावती म्हणून शासनाने आज मला पुरस्कार देऊन सन्मानित केले. या पुरस्काराने माझ्यावर जबाबदारी वाढली आहे. इंद्रायणी महाविद्यालय हे इंद्रायणी विद्यापीठ होण्याच्या दिशेने संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे तसेच संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे व सर्व पदाधिकाऱ्यांच्या, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक, आजी-माजी विद्यार्थी यांना बरोबर घेऊन प्रयत्नशील आहोत. 


             डॉ. संभाजी मलघे हे मराठी साहित्याचे अभ्यासक, संशोधक असून, त्यांनी कथा, कविता, कादंबऱ्या, ललित, संपादन, समीक्षा या साहित्य प्रकारांमध्ये आजवर 25 पुस्तके लिहिली आहेत. तसेच अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये दोनशेहून अधिक शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दहा विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. तसेच त्यांच्या 'अस्वस्थ भवताल' कवितासंग्रहास वाचकांची मोठी पसंतीस मिळाली आहे. त्यांच्या लेखनास महाराष्ट्र शासन, तसेच अनेक संस्थांचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

चौकट : 

डॉ. संभाजी मलघे हे इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेत गेल्या 28 वर्ष काम करीत असून मागील सात वर्षांपासून प्राचार्यपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांनी या पदाला न्याय देत उत्कृष्ट काम केले आहे. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या विकासामध्ये फार्मसी महाविद्यालय, इंजिनिअरिंग महाविद्यालय आणण्यासाठी केलेले प्रयत्न मोलाचे आहेत. डॉ. मलघे हे अत्यंत जिद्दी कष्टाळू आणि चिवट स्वभावाचे असून, त्यांच्यामुळे संस्थेच्या विकासाला गती मिळू लागली आहे. शासनाने या पुरस्कारासाठी अत्यंत योग्य व्यक्तीची निवड केली आहे. डॉ. मलघे यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

          - रामदास काकडे, अध्यक्ष, इंद्रायणी विद्यामंदिर संस्था, तळेगाव दाभाडे

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.


Comments

Popular posts from this blog

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास