तळेगाव दाभाडे: येथील रहिवासी विशाल चंद्रकांत शेटे व महेश तानाजी भेगडे यांनी 20 सप्टेंबर 2025 रोजी इटली येथे पार पडलेल्या आयरनमॅन इटली ट्रायथलॉन या जगातील सर्वात कठीण एकदिवसीय क्रीडा स्पर्धेत यश संपादन करत देशाचे नाव उज्ज्वल केले. आयरनमॅन – जगातील सर्वात कठीण एकदिवसीय स्पर्धा आयरनमॅन ट्रायथलॉन ही क्रीडा स्पर्धा खेळाडूंच्या शारीरिक व मानसिक क्षमतेची खरी कसोटी मानली जाते. या स्पर्धेत खेळाडूंना एकाच दिवशी, सलगपणे खालील अंतर पूर्ण करावे लागते :
•समुद्रात पोहणे – 3.8 किमी
•सायकलिंग – 180 किमी
•मॅरेथॉन धावणे – 42.2 किमी
यामध्ये वेळेची मर्यादा काटेकोरपणे पाळावी लागते. पोहण्यासाठी 2 तास 20 मिनिटे, पोहणे व सायकलिंग 10 तासांत तर संपूर्ण स्पर्धा 16 तासांत पूर्ण करणे आवश्यक असते. त्यामुळे ही स्पर्धा फक्त शारीरिक ताकदीवर नव्हे तर मानसिक चिकाटी, आत्मविश्वास व धैर्यावर आधारित असते.

गुरु-शिष्य जोडीचा पराक्रम
विशाल शेटे यांनी याआधी दोन वेळा आयरनमॅन ट्रायथलॉन यशस्वीरीत्या पूर्ण केला असून, इटलीतील ही त्यांची तिसरी कामगिरी ठरली. तर महेश भेगडे यांनी प्रथमच या स्पर्धेत सहभाग घेतला. विशेष म्हणजे महेश यांनी या कठीण स्पर्धेसाठी गेल्या एका वर्षभर विशाल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले. त्यामुळे गुरु आणि शिष्य अशी जोडी एकत्र या स्पर्धेत उतरली व दोघांनीही फिनिश लाईन पार करत इतिहास रचला.
आव्हानांनी भरलेला प्रवास
स्पर्धेची सुरुवात सकाळी 8 वाजता समुद्रातील पोहण्याने झाली. अनपेक्षित 24 अंश सेल्सियस पाण्याच्या तापमानामुळे wetsuit legal घोषित झाले. पोहताना अनेकदा स्नायूंमध्ये क्रॅम्प्स आले तरीही त्यांनी चिकाटीने पोहणे पूर्ण केले.
सायकलिंग दरम्यान प्रखर उन्हाचा तडाखा, डोंगराळ मार्ग, जोरदार हेडविंड, आणि शेवटच्या 30 किमीमध्ये प्रचंड प्रतिकूल वाऱ्याचा सामना करावा लागला. धावण्याच्या टप्प्यात म्हणजे मॅरेथॉनमध्ये मानवी मर्यादांची खरी कसोटी झाली. प्रत्येक पाऊल जड वाटत असूनही इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी शर्यत पुढे नेली.
अंतिम क्षण – तिरंग्यासह अभिमान
या शर्यतीत विशाल शेटे यांनी 14 तास 10 मिनिटे, तर महेश भेगडे यांनी 15 तास 08 मिनिटे असा वेळ नोंदवत यशस्वीरीत्या फिनिश लाईन पार केली. शेवटच्या क्षणी दोघांनीही भारतीय तिरंगा फडकवत स्पर्धा पूर्ण केली. तो क्षण केवळ व्यक्तिगत विजय नव्हता तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचा ठरला. प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या भारतीयांनी भारताचा जयघोष करत आनंदाश्रू ढाळले.
तळेगावचा अभिमान – देशासाठी प्रेरणा ही कामगिरी फक्त दोन खेळाडूंच्या विजयापुरती मर्यादित नसून, ती संपूर्ण तळेगावचा व महाराष्ट्राचा अभिमान ठरली आहे. सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त, मानसिक ताकद आणि देशभक्तीची भावना यांच्या बळावर असामान्य वाटणारी आव्हानेही जिंकता येतात हे या दोघांनी दाखवून दिले.
तरुण पिढीसाठी ही यशोगाथा एक प्रेरणादायी दीपस्तंभ आहे. “आयरनमॅन” हा शब्द केवळ स्पर्धेपुरता मर्यादित न राहता जिद्द, चिकाटी व मानवी क्षमतेच्या मर्यादा ओलांडण्याचे प्रतीक बनला आहे.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क
डॉ.संदीप गाडेकर
संपादक
मो.8208185037
महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇
https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay
महाऑनलाइन न्यूज फेसबुक अकाउंट जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇
https://www.facebook.com/share/14JRHBB62bv/
Comments
Post a Comment