पत्रकारांवरील भ्याड हल्ल्याचा निषेध ; "आरोपींवर कारवाई व्हावी, पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी व्हावी" त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) व लोणावळा (जि. पुणे) येथील घटनांवर मावळ तालुका मराठी पत्रकार संघटेनेचे निवेदन ; तहसीलदारांकडे मागण्यांची यादी
वडगाव मावळ, दि. २३ (प्रतिनिधी) - त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथे पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याने संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे., तसेच लोणावळा येथे स्थानिक पत्रकाराच्या बातमीसोबत झालेल्या छेडछाड प्रकरणामुळे पत्रकार संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असून या दोन्ही घटनांचा तीव्र निषेध नोंदवत मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने मावळ तालुक्याचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
याप्रसंगी मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुदेश गिरमे, कार्याध्यक्ष विशाल विकारी, सचिव रामदास वाडेकर, प्रकल्प प्रमुख गणेश विनोदे, सल्लागार ज्ञानेश्वर वाघमारे, रमेश जाधव, उपाध्यक्ष भारत काळे, खजिनदार संकेत जगताप, कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर ठाकर, रेश्मा फडतरे, चेतन वाघमारे, रवी ठाकर, सतीश गाडे यांसह सुभाष भोते, प्रफुल्ल ओव्हाळ, विशाल कुंभार, अभिषेक बोडके, प्रशांत पुराणिक, ज्ञानेश्वर शिंदे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. व मावळ तालुका मराठी पत्रकार संघ, वडगाव शहर मराठी पत्रकार संघ, तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघ, लोणावळा शहर पत्रकार संघ, तळेगाव दाभाडे प्रेस फाऊंडेशन, देहूरोड शहर मराठी पत्रकार संघ, कामशेत शहर पत्रकार संघ, पवनमावळ मराठी पत्रकार संघ या संघटनांचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

दिनांक २० सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वर येथे पुढारी न्यूजचे प्रतिनिधी किरण ताजणे, तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार योगेश खरे व अभिजीत सोनवणे यांच्यावर स्थानिक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांनी जीवघेणा हल्ला केला. या घटनेत गंभीर जखमी झालेले तिन्ही पत्रकार नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. यासह मावळ तालुक्यातील लोणावळा येथील पत्रकार विशाल पाडाळे यांच्या बातमीसोबत छेडछाड करून ती प्रसिद्ध करून पत्रकार विशाल पाडाळे यांची बदनामी करण्याचे विकृत कृत्य अज्ञातांनी केले.
मावळ तालुका मराठी पत्रकार संघटनेने या घटना म्हणजे लोकशाहीवर प्रहार असल्याचे सांगत कठोर शब्दांत निषेध नोंदवला. “पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून तो समाजातील अन्याय व भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवतो. अशा पत्रकारांवर होणारे हल्ले केवळ व्यक्तींवर नसून संपूर्ण लोकशाही व्यवस्थेवर आहेत. महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात असला तरी त्याचा प्रभावी अंमल होत नाही, त्यामुळे या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. तसेच त्र्यंबकेश्वर आणि लोणावळा प्रकरणांत गुन्हेगारांना योग्य ते शासन व्हावे," असे यावेळी नमूद करण्यात आले.
पत्रकार संघटनेने निवेदनात केलेल्या मागण्या :
- त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला प्रकरणी सदर आरोपींवर तत्काळ मोक्का कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा,
- ए.एस. मल्टी सर्व्हिस कंपनीचा संबंधित ठेकेदार याच्या विरोधातही गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी,
- सदर कंपनीला काळ्या यादीत टाकावे,
- लोणावळा येथील पत्रकार विशाल पाडाळे यांच्या बातमीशी छेडछाड करून ती प्रसारित करणाऱ्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करावा.
शासनाने या मागण्या विचारात घेऊन दोषींवर कारवाई करावी, पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अन्यथा मराठी पत्रकार संघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. तहसीलदार विक्रम देशमुख यांनी पत्रकारांचे म्हणणे ऐकूण घेत, त्यांच्या मागण्या शासन दरबारी मांडण्याचे आश्वासन दिले.
Comments
Post a Comment