ट्रेलरच्या धडकेत कुटुंब उद्ध्वस्त : एका मातेला जागीच मृत्यू, पाच जण गंभीर जखमी

 


तळेगाव दाभाडे दि. ८ (प्रतिनिधी) : मुंबईकडे परतीच्या प्रवासाला निघालेल्या एका कुटुंबाचे आनंदयात्रा अक्षरशः दु:खयात्रेत बदलले. गणेशोत्सव उरकून गावाहून परतणाऱ्या दोन पिकअप टेम्पोंना ट्रेलरने दिलेल्या भीषण धडकेत शालुबाई गुंड (६७) या ज्येष्ठ महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एका पाच वर्षांच्या चिमुरड्यासह पाच जण गंभीर जखमी झाले. माळवाडी येथील तळेगाव-चाकण महामार्गावर मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. धडक दिल्यानंतर ट्रेलर चालक जीव वाचवण्यासाठी वाहनासह पसार झाला. जखमींना तळेगाव स्टेशनजवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 



संदेश ढेरे (१९), रंगनाथ आहेर (३६), शितल आहेर (३४), शिवांश आहेर (५) यांचा जखमीमध्ये समावेश आहे.
मुलाच्या डोळ्यांसमोर आईचा अंत
या अपघातात प्राण गमावलेल्या शालुबाई गुंड यांचा एकुलता एक मुलगा स्वप्निल गुंड (३४) हा पिकअप चालवत होता. अपघातात तो स्वतः गंभीर जखमी झाला. आईचा मृत्यू आणि स्वतःचा जीव धोक्यात—अशा हृदय पिळवटून टाकणाऱ्या अवस्थेत त्याने सर्व पाहिले. त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 




ट्रेलरवरील लोखंडी रॉड खाली पडताच पिकअप अक्षरशः फरफटत गेला. काही क्षणात टेम्पोचे लोखंडाचे ढीग झाले. महामार्गावर लोखंडी सामग्री अस्ताव्यस्त पडली आणि वाहतूक ठप्प झाली. क्रेनच्या मदतीने रात्रभर अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली.
गणेशोत्सवातून परतताना काळाचा घाला
गुंड, आहेर व ढेरे कुटुंबीय गणेशोत्सवासाठी गावी आले होते. आनंदाने परतीच्या प्रवासाला निघालेल्या या कुटुंबांवर माळवाडी येथे काळाने घाला घातला. काही तासांपूर्वी बाप्पाला निरोप दिलेला या कुटुंबाने आता आपल्या जवळच्या व्यक्तीला कायमचा निरोप दिला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.



‘महामार्ग बनला मृत्यूचा सापळा’
“गेल्या दहा वर्षांत या महामार्गाने हजारो जीव गिळले आहेत. शेकडो कुटुंब उध्वस्त झाली, कितीजण कायमचे अपंग झाले. किरकोळ अपघातांची संख्या रोज वाढते आहे, पण सरकारकडून दखल घेतली जात नाही. शासनाने मंजुरी दिलेला चारपदरी रस्ता तातडीने पूर्ण व्हायलाच हवा. नाहीतर अजून किती कुटुंबं उद्ध्वस्त होतील सांगता येत नाही,”
असे दिलीप डोळस, उपाध्यक्ष, तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग कृती समिती यांनी संतापाने सांगितले.

जाहिरात व बातमीसाठी संपर्क

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay



Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा