मुंढवा शिवाजी चौकातील मगरपट्टा रोडवरील नित्याच्याच वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त: नाहक सोसावा लागतोय त्रास
पुणे, मुंढवा,दि. 28 सप्टेंबर 2022
मुंढवा शिवाजी चौकातील मगरपट्टा रोडवरील नित्याच्याच वहातूक कोंडीने नागरिक त्रस्त: नाहक सोसावा लागतोय त्रास.
मुंढवा मगर पट्टा रोडवरील शिवाजी चौकातील वाहतूक कोंडी आता नित्याचीच झालेली आहे.चौकाच्या दोन्ही बाजूने प्रचंड प्रमाणात वाहनांच्या रोज लांबच्या लांब रांगा लागत आहेत. यामूळे नागरिकांना बऱ्याच वेळा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. चंदननगर ते हडपसर हा मगरपट्टा रोड अतिशय वर्दळीचा आहे. या मार्गाने पुढे विमाननगर चंदन नगर, खराडी या परिसरातील अनेक आयटी कंपन्या तसेच सणसवाडी व रांजणगाव या औद्योगिक क्षेत्रात कामानिमित्त हजारो लोक या रस्त्याने प्रवास करत असतात. शक्यतो सकाळी नऊ ते अकरा व संध्याकाळी सात ते नऊ या वेळात प्रचंड प्रमाणात या चौकांमध्ये वाहतूक कोंडी होते.
चौक पूर्णपणे अतिक्रमणाने वेढलेला असून चौकाच्या दोन्ही बाजूला अतिशय निमुळता रस्ता आहे. तसेच चौकातून केशवनगर कडे उजव्या बाजूने वळण घेताना सिग्नलला फक्त दहा सेकंद मिळतात या मध्ये फक्त दोनच वहाने जाऊ शकतात त्यामुळे प्रचंड प्रमाणात पाठीमागे वाहनांच्या रांगा लागतात. तसेच साईनाथ नगरच्या बाजूने मुंढवा दिशेने ब्रिजवर विरोधी दिशेने येणाऱ्या दुचाकींची संख्या वाढल्यामुळे आणि एकदम सिग्नल सुटल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झालेली दिसून येते. शिवाय दोन्ही बाजूला रस्त्यावर डिव्हायडर तोडून बरेच वाहनचालक बेकायदेशीरपणे किंवा चुकीच्या पद्धतीने दुसऱ्या लेनवर जातात त्यामुळे बराच वेळा वाहतूक कोंडीत भर पडते. त्यामुळे अनेक वेळा अपघातांना निमंत्रण मिळते.
या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे प्रचंड प्रमाणात वेळेचा अपव्यय होत असून दररोज नागरिकांना कामावर जाण्यासाठी उशीर होतो व त्यांच्या मनस्तापामध्ये भर पडलेली दिसून येते. नित्याच्याच वाहतूक कोंडीने वाहतूक पोलीसही हतबल झालेले दिसून येतात. प्रशासनाने लवकरात लवकर या चौकामधील असलेले अतिक्रमण व रस्ता रुंदीकरणासाठी पर्याय शोधून तात्काळ यावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी नागरिकांची मागणी होत आहे.
Comments
Post a Comment