उद्या नवीन शैक्षणिक धोरणाबाबत इंद्रायणी महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन


तळेगाव दाभाडे दि. 5 

(संपादक - डॉ.संदीप गाडेकर)

 इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागांतर्गत 'नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०: आव्हाने आणि संधी' या विषयावर येत्या शनिवारी (6 एप्रिल) एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या कांतीलाल शहा विद्यालयाच्या सभागृहात हे चर्चासत्र सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे व कार्यवाह चंद्रकांत शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी दिली. 


         राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन होणार आहे. पहिल्या सत्राचे बीजभाषण पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू व राज्य सरकारच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर करणार आहेत. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विजय खरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे पहिल्या सत्राचे अध्यक्षपद भूषविणार आहेत.

          दुसऱ्या सत्राची विभागणी ही शाखांनुसार केलेली असून, कला शाखेसाठी डॉ. प्रभाकर देसाई, वाणिज्य शाखेसाठी डॉ. यशोधन मिठारे व विज्ञान शाखेसाठी डॉ. रवींद्र क्षीरसागर हे नवीन शैक्षणिक धोरणाबाबत प्राध्यापकांना मार्गदर्शन करणार आहेत.

          समारोप सत्रासाठी पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत, तर पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. संजय कप्तान हे मार्गदर्शन करणार आहेत. या सत्राचे अध्यक्षपद इंद्राणी विद्यामंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे भूषविणार आहेत.

          वाणिज्य विभागप्रमुख प्रा. रूपकमल भोसले व वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापकांच्या मदतीने हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून, मावळ तालुक्यातील सर्व महाविद्यालयांना या चर्चासत्रामध्ये समाविष्ट करून घेण्याचे नियोजन केले आहे. सर्व महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी नवीन शैक्षणिक धोरणाबाबत माहिती जाणून घेण्यासाठी या चर्चासत्रामध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी केले आहे. 

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश