डॉ.सुरेश ईसावे : शिक्षक पिढ्या घडविणारे महाशिक्षक - सूरज दिवटे, विटा



आपल्या महान देशाला महान शिक्षकांचा वारसा लाभलेला आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मनात आपल्या शिक्षकांबद्दल एक हळवा कोपरा हा नेहमी असतोच. प्रत्येकाच्या आयुष्यात आई-वडिलांनंतर शिक्षकच आदर्श स्थानी असतो, अगदी पूर्व प्राथमिक ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत कधीही.


मला सुद्धा आयुष्याच्या प्रत्येक वळणावर उत्तम शिक्षक लाभले. त्या प्रत्येकाकडून मी काहीतरी संचित वेचित गेलो, स्वतःला समृद्ध करीत गेलो. त्यामधील स्त्री शिक्षकांनी मला आईची माया संस्कार आपुलकी दिली. तर पुरुष शिक्षकांनी वडिलांचा आदरयुक्त धाक शिस्त लावली. त्याचाच परिपाक म्हणजे आज मी स्वतः एक शिक्षक म्हणून माझ्या सर्व शिक्षकांच्या संस्काराचा वारसा सोबत घेऊन सेवा करीत आहे. 

त्यापैकीच एक शिक्षक मला आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर उमेदीच्या काळात लाभले. ज्यांच्याअंगी वर नमूद केलेल्या गुणांचा अप्रतिम संगम मला अनुभवायला मिळाला. असे आमचे प्रेरणादायी शिक्षक म्हणजेच डॉ.प्रा.सुरेश गोपीचंद ईसावे सर. सर गेल्या २५ वर्षाहून अधिक काळ टिळक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, पुणे येथे ज्ञानदान करण्यासाठी शिक्षक पिढी घडवित आहेत. 

सर स्वतः ग्रामीण पार्श्वभूमीतून आल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा न्यूनगंड दूर करून त्यांच्यातील चांगले गुण हेरून प्रोत्साहित करतात. त्यांच्या बोलण्यात ते माधुर्य, सामर्थ्य लपलेले आहे. महाविद्यालयात असताना मी आणि माझ्यासारख्या अनेक शिक्षक विद्यार्थ्यांच्या अडचणींचे निराकरण ते खूप आपुलकीने करत असत. उदा. शिकवण्यापूर्वी आम्हा शिक्षक विद्यार्थ्यांना त्याचे टाचण काढावे लागते. ते टाचण तपासण्याची सरांची वेगळी पद्धत आहे. ते टाचण तपासताना सर विविध इमोजी स्माईलीचा वापर करतात. त्यामुळे काही अंशी का होईना परंतु त्या शिक्षक विद्यार्थ्यांचा वर्गावर जाण्यापूर्वी मनावरील ताण कमी होतो. सरांशी संवाद साधताना आपण एका उच्च विद्याविभूषित प्राध्यापकांशी नव्हे तर आपल्या समवयस्क मित्राशी किंवा नातलगाशी बोलत आहोत असेच वाटत असते. उदा. भूगोल विषयात नकाशाचा वापर, अत्याधुनिक तंत्राचा, नवनवीन अध्यापन पद्धतींचा वापर करून भूगोल विषय किती रंजक पद्धतीने शिकवू आणि शिकू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे श्री.ईसावे सर.



आदरणीय श्री.ईसावे सर आम्हाला भावले ते त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वामुळे. जसे की सरांना छत्रपती श्री शिवाजी महाराज, किल्ले आणि सह्याद्री विषयी नितांत आदर, श्रद्धा आहे. शब्दांपेक्षा कृती श्रेष्ठ हे आयुष्याचे तत्त्वज्ञान असलेले आमचे सर एवढ्यावरच थांबलेले नाहीत. त्यांनी आमच्यासारख्या अनेक तरुण विद्यार्थ्यांना सोबत घेऊन " ट्रेकिंग पलटण " नावाचा ग्रुप तयार केलेला आहे. याद्वारे सह्याद्रीतील विविध पुरातन किल्ले, लेण्या, भौगोलिक आश्चर्य इ.ची स्वच्छता, डागडुजी, अभ्यास आणि संशोधन केले जाते. अशा ठिकाणी पर्यटकांनी केलेला कचरा गोळा करून त्याची योग्य ती पर्यावरणपूरक विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या अद्वितीय पराक्रमामुळे संजीवन झालेल्या या पुरातन वास्तू मोकळा श्वास घेतात. ट्रेकिंग पलटण ग्रुपचे एकूण शंभरपेक्षाही अधिक ट्रेक वरील पर्यावरणस्नेही पद्धतीने पूर्ण झालेले आहेत. गेल्यावर्षी ट्रेकिंग पलटण ग्रुपने माण-खटाव तालुक्यातील वारुगड, महिमानगड, संतोषगड आणि वर्धनगड या किल्ल्यांवरसुद्धा वरील प्रमाणे पर्यावरणपूरक उपक्रम राबविलेला आहे. त्यात मला सहभागी होता आले हे माझे सदभाग्य.

तसेच सरांनी सोशल मीडियाचा सुद्धा विधायक कामासाठी उपयोग केलेला आहे. सरांनी त्यांच्या विविध क्षेत्रातील आजी-माजी विद्यार्थ्यांचा " My Students : My Pride " या नावाने व्हाट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. वेगवेगळे सामाजिक उपक्रम, समस्या निराकरण, तातडीची/महत्वाची मदत, गेट-टुगेदर यासारख्या अनेक गोष्टी या ग्रुपद्वारे पार पाडल्या जातात. सरांच्या या ग्रुपमध्ये देशातील विविध भागातील त्यांचे विद्यार्थी एकत्र आहेत यातून विविधतेत एकता हे तत्व सरांनी जोपासलेले आहे. एकमेका सहाय्य करू ; अवघे धरू सुपंथ हे सरांचे आवडते सुभाषित याठिकाणी सार्थ ठरते.

सरांना पर्यावरण तसेच एकूणच निसर्गाबद्दल प्रचंड आत्मीयता आहे. मला आठवते की मी बीएडला असताना सरांनी आमच्या ग्रुपकडून मानव-वन्यजीव संघर्ष या विषयावर पथनाट्याची चांगली तयारी करून घेतली होती. आमच्या त्या पथनाट्याला पुण्यामध्ये विविध भागात उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला होता. पथनाट्यामध्ये आम्ही मानव-वन्यजीव संघर्ष पार्श्वभूमी, कारणे, परिणाम व उपाय यांची सांगड घालून सरांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट सादरीकरण केलेले होते. आमचे श्री.ईसावे सर हे एक उत्कृष्ट निसर्ग, वन्यजीव छायाचित्रकारसुद्धा आहेत. त्यांची उत्कृष्ट छायाचित्रे बालभारतीने इयत्ता पाचवी ते दहावी च्या विविध पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करून सरांना दाद दिलेली आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाची विविध मापदंड सरांनी आम्हा विद्यार्थ्यांमध्ये रुजवली आहेत.

आमचे सर ICT in EDUCATION मधील अद्ययावत अनुभवी तंत्रस्नेही प्राध्यापक आहेत याचा आम्हा सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना सार्थ अभिमान आहे. सरांची Teacher Education Simplified, सायबर शिक्षण, ट्रेकिंग पलटण पुणे ही युट्युब चॅनेल्स आहेत. या माध्यमातून सर आजच्या नवीन शिक्षक पिढीला अध्ययन अध्यापनामधील अद्ययावत तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन तसेच सोशल मीडियाचा विधायक उपयोग तसेच सायबर सुरक्षिततेबाबत घ्यावयाची खबरदारी या आणि यासारख्या असंख्य सामाजिक सार्वजनिक विषयावर मोलाचे मार्गदर्शन करत असतात. या विषयांतर्गतच सरांनी टिळक शिक्षणशास्त्र महाविद्यालयामार्फत मोफत सायबर स्मार्ट टीचर ऑनलाईन कोर्स या शैक्षणिक वर्षांमध्ये सुरू केलेला आहे.

शिक्षण क्षेत्रातील विविध टप्प्यावरील प्लेसमेंट सर्विसेसमध्ये सुद्धा सर मोलाची भूमिका बजावत आहेत. आमचे श्री.ईसावे सर एक उत्कृष्ट समुपदेशक आहेत. याचा प्रत्यय मला स्वतःला आणि माझ्या मित्रांना बीएडला अपयश आल्यानंतर आलेला आहे. त्यावेळी आम्हा अपयशी विद्यार्थ्यांना सरांनी जे मोलाचे सकारात्मक मार्गदर्शन आणि समुपदेशन केले त्याच्या जोरावरच आज आम्ही आमच्या पायावर उभे आहोत. याबद्दल सर आम्ही तुमचे सदैव कृतज्ञ आहोत.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड मोठा बदल होणार आहे. या नवीन शैक्षणिक धोरणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे शिक्षकांना अद्ययावत प्रशिक्षण, प्रचलित परीक्षा पद्धतीत आमुलाग्र सुधारणा, विद्यार्थ्यांची सर्वांगीण काळजी, सध्याच्या शिक्षणाच्या रचनेची पुनर्रचना इत्यादी गोष्टींवर भर देण्यात आलेला आहे. या धोरणांच्या अंमलबजावणीसाठी शिक्षक हा फक्त शिक्षक नसून तो मित्र, तत्त्वज्ञ, मार्गदर्शक, सुलभक, सुविधक इ. विविधांगी भूमिका बजावणारा महाशिक्षक असणे गरजेचे आहे. अशी नवीन तरुण तडफदार होतकरू अद्ययावत तंत्रस्नेही महाशिक्षक पिढीच्या नवनिर्माणासाठी झटणाऱ्या आमच्या तीर्थस्वरूप श्री.ईसावे सरांना साष्टांग दंडवत. सरते शेवटी सर तुमचे व्हाट्सअप अकाउंटमधील वाक्य या धकाधकीच्या युगात नेहमी आम्हा शिक्षक विद्यार्थ्यांना दिशादर्शक आहे. ते म्हणजे : ना किसी से ईर्ष्या, ना किसी से कोई होड ; मेरी अपनी मंजिले, मेरी अपनी दौड.

     -- श्री. सुरज किशोर दिवटे, विटा.


Comments

  1. सुरेख शब्दांकन सुरज

    ReplyDelete
  2. विद्यार्थीप्रिय, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, निसर्गप्रेमी, आमचे गुरुवर्य आदरणीय इसावे सर 👏👏👏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश