
तळेगाव दाभाडे दि.६ (प्रतिनिधी): "शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनाचा विचार करून त्यांच्याशी मुक्त संवाद साधला पाहिजे. सहजगत्या संवादातून विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत सहज पोहोचता येते. महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा महत्वाचा टप्पा असतो. हे जीवन तुमचे उद्याचे आयुष्य आणि भविष्य घडवत असते. विद्यार्थ्यांनीही शिक्षकांच्या मदतीने आपल्या आयुष्याचा लाईट हाऊस शोधला पाहिजे." असे गौरवद्गागार इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह श्री. चंद्रकांत शेटे यांनी काढले. ते काल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ प्रसंगी यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या सभागृहामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, उपप्राचार्य प्रा. संदीप भोसले, पर्यवेक्षिका प्रा. उज्वला दिसले, स्टाफ सेक्रेटरी प्रा. राजाराम डोके, विज्ञान विभागप्रमुख प्रा. यु. एस. खाडप, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. वीणा भेगडे, कला विभागप्रमुख प्रा. के. डी. जाधव, तंत्रशिक्षण विभागप्रमुख प्रा. नीता आहिरे, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपप्राचार्य प्रा. संदीप भोसले यांनी प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा सांगत संपूर्ण वार्षिक शैक्षणिक वर्षाचे नियोजन आणि विविध उपक्रमाची माहिती देत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यानंतर पर्यवेक्षिका प्रा. दिसले मॅडम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिस्तीचे महत्व पटवून दिले.
यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्येक विभागातील दोन दोन विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विज्ञान विभागप्रमुख यु. एस. खाडप यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून विज्ञान विभागाचे महत्व आणि मागील वर्षाची निकालाची परंपरा स्पष्ट केली. प्रा. दिसले यांनी वाणिज्य विभागाची ओळख करून वाणिज्य विभागातील महाविद्यालय आणि भविष्यातील संधी सांगत वाणिज्य शाखेचे महत्त्व पटवून दिले. प्रा. के. डी. जाधव यांनी कला विभागाचे, प्रा. नीता अहिरे यांनी तंत्रशिक्षण विभागातील विविध संधींचा आढावा घेतला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी विद्यार्थ्यांनी भविष्याचा वेध घेऊन वाटचाल करावी. शिक्षकांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा. तसेच नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे. महाविद्यालयात नित्यनेमाने दररोज हजर राहावे व उत्तम नागरिक बनवून राष्ट्राच्या प्रगतीसाठी आपले योगदान द्यावे. असे उद्गार काढत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष श्री. रामदास काकडे यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांवर गुलाब पुष्पांच्या पाकळ्यांची पुष्पवृष्टी करून, पेन व पेढे देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यासाठी प्रा. प्राची भेगडे, प्रा .शैलजा मतकर, प्रा. राधिका साठे, प्रा. घोडके, प्रा. नाटकर, प्रा. कुटे , प्रा. खेंगले, प्रा. भुजबळ, इतर सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मेघा कुटे यांनी केले. आभार प्रा. प्राची भेगडे यांनी मानले.
डॉ.संदीप गाडेकर
संपादक
मो.8208185037
महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay
Comments
Post a Comment